Ad will apear here
Next
अ थाउजंड ब्रेन्स - भाग १


जेफ हॉकिन्स यांच्या ‘अ थाउजंड ब्रेन्स’ या पुस्तकाची ओळख करून देणाऱ्या लेखमालेचा हा पहिला भाग... 
......
‘विश्वातली सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट कोणती आहे सांगू? विश्व अस्तित्वात आहे, हे ज्या गोष्टीला माहिती आहे अशी विश्वात एकच गोष्ट आहे, जी गोष्ट तीन पौंडाच्या एका गोळ्यात आपल्या डोक्यात सामावलेली आहे. यावरून मला एक जुनं कोडं आठवतं. जर जंगलात एक वृक्ष उन्मळून पडला आणि तिथे तो आवाज ऐकायला कोणी नसेल? तर खरोखर आवाज झाला असं म्हणता येईल का? तसंच विश्व अस्तित्वात आहे हे कळणारा मेंदू अस्तित्वात नसेल तर विश्व खरोखर अस्तित्वात आहे का? कोणाला ठाऊक? पण आपल्या कवटीतल्या लाखो पेशींना विश्व अस्तित्वात आहे इतकंच माहिती आहे असं नसून, ते विश्व अमर्याद आणि अनंत काळापासून आहे हेदेखील माहिती आहे. या पेशी जगाचं एक मॉडेल तयार करायला शिकल्या आहेत. ही माहिती विश्वात दुसऱ्या  कोणाकडेच नाही.. मी माझं आयुष्य मेंदू हे कसं साध्य करतो हे समजावून घेण्यात घालवलं आहे. मी जे शिकलो ते एक्सायटिंग आहे.. तुम्हालाही ते एक्सायटिंग वाटेल अशी आशा आहे...!’

‘अ थाउजंड ब्रेन्स’ या जेफ हॉकिन्स यानं लिहिलेल्या पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणातला हा भाग...! मेंदू आणि विशेषत: निओकॉर्टेक्स या मेंदूच्या भागावर संशोधन करणाऱ्या जेफ हॉकिन्सचं करिअर Remarkable आणि विस्मयचकित करणारं आहे. 

कॉर्नेल विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग शिकलेल्या जेफनं नंतर इंटेल कंपनीत काम सुरू केलं. मेंदूवर संशोधन करायची संधी तिथे त्याला मिळाली नाही. तेव्हा त्यानं शिकण्यासाठी अमेरिकेतल्या ‘एमआयटी’मधल्या ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या विभागात प्रवेश घेतला. तिथल्या मुलाखतींमध्ये तज्ज्ञांनी मेंदूवर अभ्यास करून इंटेलिजंट मशिन्स तयार करण्याचा त्याचा प्रस्ताव धुडकावून लावला गेला. ‘मेंदू हा एक अस्ताव्यस्त कम्प्युटर आहे आणि त्याचा अभ्यास करायची गरज नाही,’ असं त्याला सांगण्यात आलं. मग त्यानं कॅलिफोर्नियामध्ये बर्कली विद्यापीठात न्यूरोसायन्समध्ये डॉक्टरेट करण्यासाठी १९८६च्या जानेवारी महिन्यात प्रवेश घेतला. तिथल्या डॉ. फ्रॅंक वेरब्लिन यांनी त्याला ‘जे संशोधन करायचं आहे त्याची माहिती’ लिहायला सांगितली. निओकॉर्टेक्सवर काम करायचा त्याचा मनोदय कळल्यावर अनेकांना तो विषय आवडला. तो महत्त्वाकांक्षी विषय स्तुत्य असला तरी संशोधनाचा प्रस्ताव मात्र परत फेटाळलाच गेला.



जेफनं मग तिथे गणितज्ञ, मानसशास्त्रतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ मेंदूबद्दल गेल्या ५० वर्षांत जे  काय म्हणतात याचा अभ्यास केला. त्यानंतर तो सिलिकॉन व्हॅलीत गेला. ‘ग्रिडपॅड’ हा पहिला टॅब्लेट कम्प्युटर काढला. १९९२ साली ‘पाम कम्प्युटिंग’ सुरू करुन ‘पामपायलट’ आणि ‘ट्रिओ’ हे पहिले स्मार्टफोन्स शोधले. 

आयटीमधल्या करिअरमध्ये सर्वोच्च ठिकाणी असताना परत मेंदूवरच्या संशोधनाला वाहून घेण्यासाठी त्यानं ‘रेडवूड न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूट-आरएनआय’ २००२ साली सुरू केली. ‘आमचा चांगलाच जम बसला तेव्हा आम्ही बर्कलीमध्ये आरएनआय हलवली. ज्या संस्थेनं १९ वर्षांपूर्वी मेंदूवर संशोधन करायला नकार दिला होता त्याच संस्थेनं आता मेंदूवर संशोधन करणाऱ्यास संस्थेची आम्हाला गरज आहे असं सांगून आम्हाला आमंत्रण दिलं,’ असं जेफनं पुस्तकात अभिमानानं लिहिलं आहे. 

आरएनआय बर्कलीत गेल्यावर जेफनं काही जणांबरोबर मिळून न्यूमेंटा ही कंपनी सुरू केली. २०२१च्या मार्चमध्ये जेफचं ‘अ थाउजंड ब्रेन्स’ प्रकाशित झालं तेव्हा ‘न्यूमेंटा’ १५ वर्षांची झाली आहे. 

आपल्या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात पुढे जेफ म्हणतो :
‘मी लिहिलेले हे शब्द तुमच्या डोक्यातल्या सेल्स – पेशी वाचतायत. हेच किती भन्नाट आहे याचा विचार करा. पेशी साध्यासुध्या असतात. मेंदूतली केवळ एकच पेशी विचारात घेतली तर तिच्यामुळे तुम्हाला वाचता येत नाही, विचारही करता येत नाही. खरं तर काहीच करता येत नाही; पण अशा पुरेशा पेशी मिळून आपला एक मेंदू तयार होतो. जो निव्वळ पुस्तकं वाचतो इतकंच नव्हे तर ती लिहितोही. त्या एकत्र झालेल्या पेशी इमारतींचं डिझाईन करतात, तंत्रज्ञानातले नवनवीन शोध लावतात आणि विश्वाची रहस्यं उलगडू शकतात. साध्यासुध्या पेशींनी तयार झालेला मेंदू बुद्धिमत्ता – इंटेलिजन्स कसा निर्माण करतो हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, जो आजपर्यंत तसाच गूढ आहे.’

मेंदू कसं कार्य करतो ते समजून घेणं हे मानवासमोरच्या आव्हानांपैकी सर्वांत विलक्षण आव्हान आहे. या शोधासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभे राहिले. युरोपमधला ‘ह्यूमन ब्रेन प्रोजेक्ट’ आणि ‘इंटरनॅशनल ब्रेन इनिशिएटिव्ह’ ही त्याची उदाहरणं. मेंदूचं काम समजावून घेण्यासाठी, जगातल्या जवळपास सर्व देशांमध्ये हजारो न्यूरोसायंटिस्टस वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण प्रोजेक्ट्सवर काम करत असतात. न्यूरोसायंटिस्ट्स वेगवेगळ्या प्राण्यांच्या मेंदूंचा अभ्यास करून वैविध्यपूर्ण प्रश्न उपस्थित करत असले तरी न्यूरोसायन्स या विषयाचं अंतिम ध्येय मानवी मेंदूत बुद्धिमत्ता कशी तयार होते हे शिकणं यातच सामावलेलं आहे.  

मानवी मेंदू हे एक गूढ आहे असं जर मी विधान केलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. दर वर्षी, मेंदूबद्दलची नवीन निष्कर्ष जाहीर होत असतात, मेंदूबद्दलची नवीन पुस्तकं प्रकाशित होत असतात. आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारख्या विषयातले संशोधक आपण उंदीर किंवा मांजर यांच्या बुद्धिमत्तेच्या पातळीची बुद्धिमत्ता निर्माण करू शकलो अशा प्रकारचे दावेही करत असतात. या संशोधकांना मेंदूचं कार्य कसं चालतं ते बऱ्यापैकी ठाऊक असेल असं आपण म्हणू शकतो; पण न्यूरोसायंटिस्टसना विचारलं तर ‘आम्ही सगळेच याबाबत अजून अंधारात आहोत’ असं ते मान्य करतील. आम्ही सगळ्यांनी मेंदूबद्दल चिक्कार माहिती आणि फॅक्ट्स शोधून काढल्या आहेत; पण मेंदूचं संपूर्ण कार्य कसं चालतं याबाबत आमची समज अत्यंत तोकडी आहे. 
(क्रमश:)

- नीलांबरी जोशी

(संदर्भ : A Thousand Brains  : Jeff Hawkins (Preface by Richard Dawkins) 

या पुस्तकाच्या परिचयाच्या पुढील दोन भागांच्या लिंक्स -
दुसरा भाग : https://www.bytesofindia.com/P/RUCNCW
तिसरा भाग : https://www.bytesofindia.com/P/KUCHCW

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PUCYCW
Similar Posts
अ थाउजंड ब्रेन्स - भाग २ जेफ हॉकिन्स यांच्या ‘अ थाउजंड ब्रेन्स’ या पुस्तकाची ओळख करून देणाऱ्या लेखमालेचा हा दुसरा भाग.
अ थाउजंड ब्रेन्स - भाग ३ जेफ हॉकिन्स यांच्या ‘अ थाउजंड ब्रेन्स’ या पुस्तकाची ओळख करून देणाऱ्या लेखमालेचा हा तिसरा भाग....
काळोखाला भेदणारा प्रकाश समोर असतोच... काळोखाला भेदणारा प्रकाश समोर असतोच... जर त्याच्याकडे पाहायची हिंमत असेल तरच... जर स्वत: प्रकाश होण्याची हिंमत असेल तरच... जो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्याच्या सोहळ्यात आमंडा गॉर्मन या २२ वर्षांच्या कवयित्रीनं The Hill We Climb ही अप्रतिम कविता सादर केली. त्यातल्या या शेवटच्या ओळी
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून...! अन्न, वस्त्र, निवारा या मूळ गरजा भागवणारा मानव उत्क्रांत होत गेला तशा दया, करुणा अशा उन्नत समजल्या जाणाऱ्या सकारात्मक भावना त्याच्यात रुजत/दृढ होत गेल्या. तसं इस्टवूडनं सुरुवातीच्या चित्रपटात गुन्हेगार, मग इन्स्पेक्टर आणि नंतर मानसिक गुंतागुंत जाणणारा, दया, करुणा, प्रेम आणि मदतीचा हात पुढे करणारा नायक रंगवला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language